प्रिय आई ,
सहा वर्षानंतर पत्र लिहतोय, आधी कधी इतकी आठवण आली असं नाही पण का कुणास ठाऊक आज हे पत्र लिहावसं वाटलं .
कशी आहेस ?
माझ्या पत्राला उत्तर मिळेल की नाही माहित नाही पण असशील तिथे सुखीच असशील , बाबापण असतील ना तिथे ते कसे आहेत ? छोट्या किमयाला तर त्यांनी पाहिलं देखील नाही, फारसे आठवत नाही पण जाताना ते म्हणाले होते "आईची काळजी घे " तेव्हा माहित नव्हतं ती आमची शेवटची भेट असेल. बाबा त्या नंतर घरी आले ते तिरंग्यात लपटून, संपूर्ण गाव जमा झाला होता, सर्व रडत होते,ओरडत होते आणि तू किमयाला कुशीत घेऊन बाहेर आलीस डोळ्यात एक टिपूस पाणी नव्हतं, अभिमान होता तुला तुझा धनी देशासाठी शाहिद झाला. अंत्यविधी नंतर चार-पाच महिने लोक घरी यायचे,रडायचे. मला कधी समजलेच नाही माणूस मेल्या नंतर कशासाठी हा इतका आरडा-ओरडा . पण मी ,तुला कधी रडताना पाहिले नाही.
ह्या आधी आपल्या घरी कधी इतकी गर्दी पहिली नव्हती मी .
बाबा गेल्या नंतर एक-दीड वर्षांत तू मला आणि किमयाला घेऊन घर सोडल , किमया तेव्हा २ वर्षाची असेल आणि मी ७. आपण मुंबईच्या घरी आलो आधी सुट्टीत इथे यायचो तेव्हा मला मजा वाटायची ,पण आता मला गावाकडची आठवण यायची इथल्या शाळेत माझं मन कधी रमलंच नाही, पण हळूहळू मला सवय झाली. किमया आता मोठी होत होती.
मला तुझी होणारी दमछाक बघवत नव्हती, पाळणाघरात किमयाला ठेऊन मला शाळेत सोडून स्वतः कामावर जायचीस पुन्हा घरी येऊन माझा आणि किमयाचा अभ्यास.अभ्यास कसला तिचा रोज नवीन नवीन गोष्टी सांगत बसयचीस तिला आणि मला 'अभ्यास कर अभ्यास कर ', सुट्टीच्या दिवशी बाबा न्यायचे तसं बाहेर घेऊन जायचीस पण अजूनही समजत नव्हता तू आम्हाला कधी परत गावी का नेलं नाहीस ? तू म्हणायचीस मी मोठा झालो नौकरीला लागलो कि गावी जाऊन येऊ. मला खरंच अभिमान वाटतो तुझा, शाळेत सर्व जण म्हणायचे ,"my dad is my superhero". पण माझ्यासाठी दोन्ही तूच होतीस बाबापण आणि आईपण "YOU ARE MY SUPERHERO MOM . "
बघता बघता वर्ष कसे निघून गेले समजलंच नाही ,आता किमया शाळेत जायला लागली होती आणि मी कॉलेजला पण तुझा दिनक्रम ठरलेलाच. आमच्यातच गुंतलेली असयचीस कायम. स्वतःसाठी कधी वेळ देताना पहिलंच नाही तुला. गावी होतो तेव्हा हळदी-कुंकू,मंगळा-गौर कधी कुठे सहजच मैत्रिणीं सोबत फिरायला जायचीस पण मुंबईला आल्यापासून आम्हीच तुझे विश्व् झालो होतो.
कायम वाटत राहायचं एकदा का हे कॉलेज संपलं आणि जॉब मिळाला कि तुला कोणत्यातरी ग्रुपची मेम्बरशीप घेऊन देणार , आमच्या साठी खूप काही केलंस तू आता माझी वेळ होती तुझ्यासाठी काहीतरी करण्याची.
बघता बघता शेवटचं वर्ष पूर्ण झाला interview दिला जॉब मिळाला सर्व ठीक होणार होत आता पुन्हा गावी जाता येणार होत. किमया आता कॉलेजला जाणार, आता सर्व जबाबदारी मी घेणार असं मनोमन ठरवतच होतो,
कामाचा चौथा दिवस होता तो जेव्हा तुझ्या ऑफिसमधून फोन आला, पण ह्या वेळी दुसऱ्या बाजूला तू नव्हतीस.
दुसरीकडून आवाज आला "तुझ्या आईला सिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे ताबडतोब तिथे ये ." हे वाक्य ऐकल्यावर पायाखालची जमिनच सरकली. सर्व स्वप्न एका क्षणात डोळ्यासमोर आली आणि तसाच मी सिटी हॉस्पिटल मध्ये पोहोचलो वॉर्ड नंबर ३ मध्ये तू निपचित पडलेली डॉक्टरांना विचारल्यावर समजलं हृदविकाराच्या झटक्याने तुझा मृत्यू झाला. सर्व स्वप्न मातीमोल झाली. पुरता खचून गेलो. किमया रड-रड रडत होती, आणि त्या वेळेस माझ्या डोळ्यातलं पाणी कुठे गायब झालं माहित नाही, माझ्यावर सर्व जबाबदारी येऊन पडल्या होत्या अचानक जसं मी ठरवलं तसं काहीच झाला नव्हतं विचारच केला नाही कधी तू नसलीस तर आमचं काय होईल ? तुझ्याशिवाय जगणं कधी विचारच नाही आला हा मनात .तुझ्याभोवती आमचा विश्व् आणि तूच नाही तर संपूर्ण जग हरवून बसलो मी त्या एका क्षणात. माझा आयुष्य संपून टाकावंस वाटले पण किमया तिचं काय किमयासाठी जगायचं होतं मला आता तिच्यापासून माझं दुःख लपवून ठेवत आलो कधी तिच्यासमोर तुझी आठवण काढून रडलो नाही. पण रात्र रात्र रडत असायचो तुझी खूप आठवण यायची आणि अजूनही येते.बाबा गेले तेव्हा तू अशीच रडायचीस का ग, तु देखील आमच्यासाठी strong होण्याचं नाटक करत आलीस का जस आज मी करतोय ??
असं म्हणतात बापाच्या बुटात पाय ठेवले कि समजतं बापाचं दुःख काय त्याच टेन्शन किती पण तू गेल्यावर मला समजलं एका आईचं दुःख काय असत तिच्या मागे किती लचांड असतात. आता सकाळी उठवायला तू नव्हतीस, आयता डबा मिळत नव्हता , आईच्या हातचं जेवण काय हेच पुरता विसरून गेलोय आता मी . आता मी किमयाची आई मी दादा मी बाबा मी , तीन तीन भूमिका माझ्या वाट्याला देऊन निघून गेलीस अचानक अवेळी बाबासारखीच. पण खरं सांगू तर बाबा गेले तेव्हा इतकं दुःख नाही झाला जेवढं तू गेल्या नंतर झाले.
आमचा आणि किचनचा संबंध फ़्रिज मध्ये खाऊ शोधायचा आणि पाण्याच्या बाटल्या भरून ठेवायचा इतकाच. सुरवातीला १० दिवस बाजूच्या काकी जेवण देत होत्या पण नंतर आमचं आम्हांलाच करायच होत, किमया मुलगी असून सुद्धा तू तिला कधी काही जेवण शिकवलंस नाहीस . मग माझं तर दूरच राहिला . सुरवातीला काही दिवस बाहेरून ऑर्डर करायचो पण बाहेर किती खाणार,मग नंतर मी YOUTUBE वरून व्हिडिओ पाहून जेवण शिकायला लागलो , किमयापण मदत करायची आणि हळूहळू तीच जेवण बनवायला शिकली आणि मी तिला मदत करायला लागलो.
आज आम्ही दोघेही आपल्या क्षेत्रात यशस्वी आहोत.सर्व काही आहे पण तू नाहीस सोबत याचीच खंत जाणवतेय पत्र तुझ्याकडे पोचणार नाही माहित आहे पण कुठेतरी तुला हे सर्व सांगायचं होत म्हणून लिहून काढलं सर्व काही नाही पण जितकं जमलं तितकं.
तुझी आजही आठवण येते आणि तुझी कमी आजही जाणवते.