Protected by Copyscape

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

पाऊस

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
शाळेत जाणारी मुलं पाहीली आणि वाटलं ,
पाऊस म्हणजे शाळेची सुरवात नवी पुस्तकं,नवं दप्तर,
 नवे कपडे आणि नवीन दोस्त....

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
टपरीवर चहा पिताना वाटले ,
छे!! पाऊस म्हणजे तर टपरीवरची कटिंग ,
एक प्लेट भजी आणि कट्ट्यावरचे मित्र ....

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
घरातून बाहेर पडले तेव्हा वाटलं,
अरे पाऊस म्हणजे लेट झालेल्या ट्रेन,
नाक्यावरचं ट्रॅफिक आणि छत्र्यांची गर्दी....

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
समुद्र किनारी फिरताना वाटलं ,
पाऊस म्हणजे प्रेमाची सुरवात....

पावसावर काहीतरी लिहावं म्हटलं ,
शेतात राबणाऱ्या आईला पाहून वाटलं ....
पाऊस म्हणजे हाच मातीचा गंध ,
आणि बीजाला फुटणारा अंकुर,
पण जेव्हा बाबाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिला तेव्हा वाटलं
अरे पाऊस म्हणजे बळीराजाचे अश्रू पाहून
त्या मेघराजाला फुटलेला पाझर ....

शनिवार, २ जुलै, २०१६

क्षितीज - संवाद माझा माझ्याशी

संध्याकाळी समुद्रकिनारी सहजच फिरायला आलो. समोर विविध रंगांनी आभाळ रंगून गेलं होत दूरवर जमीन आणि पाणी एकत्र आल्याच पाहिलं आणि बालपणाच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या "वो बचपन के भी क्या दिन थे ।". 

   लहानपणी जायचो फिरायला दूर बाबा सोबत, कधी समुद्र किनारी,भाजीमंडईमध्ये  तर कधी सहज वाट नेईल तिथे.  मोकळा रस्ता समोर निरभ्र आकाश मजा यायची फिरायला. आणि लहानपणी उत्सुकता असायची ती एकाच गोष्टीची क्षितिजाची. जिथे आकाश आणि भूमी एक होतात  तो भाग म्हणजे "क्षितिज"
आणि बाबा चा हाथ सोडून त्या क्षितिजा मागे धावत जायचो  आणि आईची आठवण यायची अर्थातच इतकं सुसाट धावल्यावर पडणारच ना मग आपसूक तोंडून आई गssss शब्द यायचे आणि थांबायचो।

बाबा नेहमी सांगायचा "अरे, या क्षितिजा मागे धावून नको हो, दिसायला फार सुंदर दिसतं हे आकर्षक, मनमोहक पण लांबूनच.  जितकं जवळ जाशील हे तितकंच लांब जातं.  बघ ना  याच्या मागे धावत धावत किती लांब आलास तू. "
हो खरंच,किती  लांब गेलो होतो मी तेव्हा त्या क्षितिजामागे धावता धावता बाबा मागे आहे हयाचं सुद्धा भान नव्हत मला.

    बघ हो,क्षितिजा मागे धावता धावता मलापण विसरलास,म्हणाला  होता  बाबा.  आणि  मी वळून sorry म्हणालो होतो  तेव्हा , आजही आठवतंय....

    बाबाने तेव्हा किती कमी शब्दात जीवनाचं सार समजावलं होतं.. बस तेव्हा बालबुद्धिला समजलं नव्हतं पण आज सर्व समजत आहे.

    शिक्षणासाठी मुंबईला आलो आणि नंतर इथेच स्थाईत झालो आई बाबा गावीच राहिले. माझं घर घेतल्यावर बोलवलं ही त्यांना एकदा दोनदा  पण ते तिथेच खुश आहेत वाटतं. घर कसलं ते नुसता flat घर तर ते जिथे सर्व गुण्यागोविंदाने राहतात माझे सर्व तर गावाकडेच राहिले . कधीकधी वाटायंच,"राग आला असेल का ?माझा त्यांना. " इतके वर्ष मी साधी विचारपूसही केली नव्हती.  फक्त दर महिना मनीऑर्डर पुरती तार यायची त्यांची तितकाच काय तो संबंध कधी गावी गेलो नाही.सुरवातीला आई फोन करायची पण मला वेळ नसायचा कॉलेज क्लास यातच वेळ जायचा सर्व, मग कंटाळा यायचा आणि बोलायचं राहूनचं जायचं  कॉल बॅक नाहीच केला कधी.

    नंतर नंतर मी माझं  करीयर करण्यात गुंतून गेलो.आणि हळू हळू आईचे फोन पण यायचे कमी झाले आणि शेवटी बंदच. मात्र तार अजूनही सुरूच होती फरक इतकाच कि आधी गावाकडून मनीऑर्डर यायची आणि आता मी दर महिना पैसे पाठवायचो.  आणि आता तर आई बाबाच राहिले नाही मग गावाकडे जायचा प्रश्नच उरला नाही आणि मनीऑर्डर पण बंद .

    आज मी माझं क्षितिज गाठलं माझी सर्व स्वप्न पूर्ण केली  त्या क्षितिजाचा पाठलाग केला .. आज मी सर्जन  आहे.माझं स्वतःच हॉस्पिटल आहे. गरजू लोकांसाठी एक क्लिनिक काढलं आहे. आज सर्व काही आहे माझ्याकडे, पण आई बाबा नाही सोबतीला, नाही जास्त मित्र; संपत्ती खूप कमावली पण आपली माणसं मात्र हरवली. बाबा बरोबर बोलायचा आज समजतंय मला.

    मी वेडा क्षितिजा चा पाठलाग करत राहिलो आणि गाठलं माझं "क्षितिज"  पण  या क्षितिजाचा पाठलाग करता करता खरंच आपली माणसं कधी मागे राहून गेली समजलंही नाही आणि समजलं तेव्हा उशीर झालेला आहे.


सोमवार, ६ जून, २०१६

माणुसकी

सहज पार्क मध्ये चालत होते पार्क तसा शांतच होता वर्दळ होती ती म्हाताऱ्या माणसांची आणि लहान मुलांची , तशी भेळ वाल्याचीही  रेलचेल होतीच पार्क म्हटल कि आलंचं सर्व ,
पण माझं लक्ष वेधून घेतलं ते त्या ब्राह्मण गृहस्थानी तिशी पार केली असेल,शिकलेले दिसत होते. गळयात माळ कपाळावर चंदन लावलेलं.आपल्या लहान भावाला काहीतरी सांगत होते हिंदू मुस्लिम जाती बद्दल. मी काहीशी दूरच होती पण अस्पष्ट असं बोलणं पडत होत माझ्या कानावर ...
मलाही थोडं कुतूहल वाटलं तशी मलाही हौस, जाती धर्मा बद्दल जाणून  घायची म्हणून त्याच्या शेजारच्या बाकावर जाऊन बसले आता त्यांचा संवाद स्पष्ट ऐकू येत होता ,
गृहस्थ:" तुझा तो मित्र आहे ना रे अली त्याच्या पासून थोडा लांबच राहा"
मुलगा:"का रे दादा काय झालं .खूप चांगला मुलगा आहे तो हुशारसुद्धा सलग तीन वर्ष शाळेत पहिला येतो तो शिवाय sports मध्ये पण अव्वल"
गृहस्थ : "ते काहीही असो तुला सांगितलं ना दूर राहायचं"
मुलगा: "अरे पण का ??"
गृहस्थ : "अरे तू ब्राह्मण आहेस आणि तो मुस्लिम .मांस मटन खाणारे ते त्यांच्या पासून दूरच राहा तुलाही बाटवतील आणि लक्षात ठेव तू ब्राह्मण आहेस तुला असं वागणं शोभत नाही ."
मुलगा:"दादा, पण तो खरचं खूप चांगला मुलगा आहे"
मला थोडी चीड येत होती त्या माणसाची या technology च्या काळात देखील असे काही लोक आहेत हे पाहून थोडं वाईटही वाटलं पण त्या मुलाचा विरोध पाहून काहीस मन शांत झालं तितकंचं समाधान उद्याची पिढी तरी जाती भेदाला विरोध करतेय पाहून आनंद वाटला.
तितक्यातच त्या  गृहस्थाना ठसका लागला माझ्या हातात पाण्याची बाटली होतीच मी लागलीच ती पाण्याची बाटली त्यांच्या हातात दिली .
ते ही निसंकोच पाणी प्यायले .
आणि मला त्यांनी माझं नाव विचारलं ,माझं नाव मी सांगितलं "शबाना"
तसा रंगच उडाला त्यांच्या चेहऱ्याचा इतका वेळ जाती बद्दल बोलत असणारे ते गरजेच्या वेळी एका मुस्लिम मुलीने दिलेले पाणी प्यायले कदाचित धर्म भ्रष्ट झाला त्यांचा.  असंच वाटलं असेल त्यांना पण ,त्यांच्या नजरेत अपराधीपणाची भावना दिसली मला.
मीच म्हणाले ,काका , माझा धर्म "माणुसकी" मी माझ्या धर्मच पालन केलं आणि तुम्हाला पाणी देऊन मी तुमचा धर्म बुडवला असेल तर माफ करा  . तो मुलगा मात्र आमच्याकडे पाहत होता त्याच्या मनात काय चाललेलं त्यालाच ठाऊक!

बुधवार, २० एप्रिल, २०१६

It's you

My first thought of the day ..
When I was depressed it's you who encouraged me ...
Yaa its you with whom I like to  share  everything ..
It's you who always love me...
Very important Person in my life is "YOU"..
Who always be with me...
You are the one who cares for me  all the time ...
More than my friend...more than my sister.. It's you my dear mother

Happy mother's day

रविवार, २० मार्च, २०१६

माझा समाज

असा कसा रे समाज  माझा ?
मुलगा झाला म्हणून उत्सव साजरा करणारा तर मुलीला गर्भात मारणारा
आणि स्त्री भ्रूण हत्या रोखा  म्हणून जनजागृती करत फिरणारा  …
असा कसा रे समाज  माझा ?


आईला देव मानणारा आणि तिलाच देवळात जाऊ न देणारा
स्त्री ची पूजा करणारा आणि तिलाच विटाळ समजणारा
असा कसा रे समाज  माझा ?



दाखल्यावर जात लिहणारा आणि शाळेत सर्व धर्म समभाव  शिकवणारा 
आणि भारतीय माझे बांधव म्हणत जातीवादाला बळी पडणारा 
असा कसा रे समाज  माझा ?

मुलाने मुलगी पळवून आणली तर अभिमानाने सांगणारा
आणि स्व:ताची मुलगी पळून गेली म्हणून तिला वाळीत टाकणारा
असा कसा रे समाज  माझा ?


स्त्री स्वतंत्र आहे म्हणत भावनांच्या बंधात तिला जखडणारा,
स्त्री सुरक्षेसाठी झगडणारा आणि तिच्यावरच अत्याचार करणारा 
असा कसा रे समाज  माझा ?

जिवंतपणी अवहेलना करणारा आणि मेल्यावर गोडवे गाणारा 
Smart जगात वावरतानाही अंधश्रद्धेला बळी पडणारा
असा कसा रे समाज  माझा ?

सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

आयुष्य हे असं जगायचं असतं

आयुष्य हे असं जगायचं  असतं 
कधी हसता हसता डोळे भरून येतात ,
तर कधी डोळ्यात दाटलेल्या अश्रूंना 
लपवायला हसावं लागतं ……… 
कधी मनात नसतानाही बोलावं लागतं 
तर कधी बोलायचं असूनही सारे  काही  मनात ठेवावं  लागतं ………. 
आयुष्य हे असं जगायचं  असतं 
कधी हसावं  लागतं ,कधी रडावं लागतं …… 
मुखवटा घालून जगात वावरावं लागतं ......... 
आयुष्य हे असं जगायचं  असतं  ...........