राजधानी कोल्हापूर मध्ये स्थित शिलाहार कालीन स्वराज्याचा खंदा पहारेकरी म्हणजेच खेळणा किल्ला .छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धिचातुर्याने जिंकलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे हाच तो 'विशाळगड'. आंबे घाटात वसलेला हा किल्ला पूर्वी कोकणातील रस्ते, कोकणातील बंदरे आणि कोल्हापूर बाजारपेठ ह्यावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या शिवा काशीद , बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या बलिदानाची साक्ष देणारा हा विशाळगड नावाप्रमाणे विशाल आहे ह्याची प्रचिती किल्ला पाहिल्यावरच येते. किल्ल्यावर सध्या अतिक्रमण झाल्यामुळे विशाळगड गड कमी आणि गाव आहे असंच वाटतं,किल्ल्यावर होत असलेले गैर प्रकार आणि किल्ल्याची दुरावस्था पाहवत नाही म्हणून अनेक शिवभक्त ह्या किल्ल्याकडे जायला मागत नाहीत त्यांना एकच सांगावं वाटत कि जितकं जास्त दुर्लक्ष करू तितका त्रास वाढत जाईल...
गुरुवार १४ जुलै २०२२ रोजी एक बातमी आली ' विशाळगडाचा बुरुज ढासळला ' आणि पूर्ण महाराष्ट्र आक्रोश करू लागला 'विशाळगड साद घालतोय , 'विशाळगड वाचवा!!' असे बरेचसे फोटो विडिओ सोशल मीडियावर वायरल झाले आणि दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी पुरातत्त्व खात्याकडून " विशाळगडाच्या तटबंदीचे वाटेवर ढासळेले दगड वरती नेऊन ठेवण्यासाठी एक मोहीम राबवण्यात यावी " अश्या आशयाचे पत्र 'सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान' साठी रवाना करण्यात आले. दुर्गसंवर्धनाचा वसा हाथी घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानने अवघ्या एका दिवसात नियोजन करून रविवारी ५०० हून अधिक दुर्गसेवकांसोबत यशस्वीरित्या हि मोहीम राबवली आणि सर्व दगड रणमंडळ टेकडी वर व्यवस्थित रचून ठेवले जेणेकरून पुढे हेच दगड बुरुजाच्या कामासाठी वापरता येतील.
माझी विशाळगडची वारी घडली ती ह्याच मोहिमेमुळे... शनिवारी रात्री मुंबईहुन प्रवासाला सुरवात झाली आणि रविवारी पहाटे ६.१० वाजता आम्ही २० दुर्गसेवक गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि समोर विशाळगड धुक्यामधून डोकावताना दिसला. गड विशाल असला तरी प्रवासात येताना कुठूनही त्याचं दर्शन मला तरी झालं नाही. एक लहानसा पूल पार करून काही पायऱ्या चढून वर आलो कि उजवी कडे मुंढा दरवाज्याकडे जाणारा पायरी मार्ग आहे आणि डाव्याबाजूला लोखंडी शिडी मार्ग जिथला बुरुज ढासळला आहे. इथेच उजव्या बाजूला एक चौकोनी वीरगळ पाहायला मिळते, पावसाळ्यात शेवाळ आल्यामुळे हि वीरगळ लगेच दृष्टीस पडत नाही. ढासळलेल्या तटबंदी मधून एक लोखंडी पाईप खाली आलेला होता हा शिवकालीन नसावा हा पाईप कुठून आला माहित नाही तटबंदी ढासळण्यासाठी हा पाईप कारणीभूत असेल का असा प्रश्न पडलाय !!!
आम्ही डावीकडे वळलो, काही दुर्गसेवक आमच्या आधीच गडावर पोहोचले होते त्यामुळे मोहिमेची सुरवात झालीच होती वेळ न दवडता आम्ही कामाला सुरवात केली. लोखंडी शिडीवर दुर्गसेवकांची एक साखळी तयार झाली होती. खाली असलेले सर्व लहान मोठे दगड एक-एक दुर्गसेवकाच्या हातातून वर सरकत होते वातावरण मध्ये वेगळाच जोश होता "हर हर महादेव !!" , "छत्रपती शिवाजी महाराज कि जय !!!" अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. आपल्यामागे कुणाचा तरी आधार आहे हे एकदा समजलं कि मन निर्धास्त होऊन जातं तसे आमचे गुरुवर्य आमचे आधार स्तंभ 'श्रमिक सर' आमच्या सोबत ह्या मोहिमेत सहभागी होते त्यामुळे सर्व निर्धास्त होऊन काम करत होते. काही दगड उचलत होते काही माती उपसत होते कुणी ह्या सर्वांना पाणी पाजत होतं आणि एक चिमुकली दुर्गसेवक दगड झेपत नाही ,कुणी मला दगड उचलू देत नाही म्हणून रुसून बसली होती.
जवळ जवळ ५०० हून अधिक दुर्गसेवक ह्या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते उत्तम नियोजन आणि सर्व दुर्गसेवकांच्या मेहनतीमुळे हि मोहीम अवघ्या ६ तासात पूर्ण झाली.
विशाळगड ढासळतोय म्हणून सोशल मीडिया वर लाखो लोक रडताना दिसले पण जेव्हा विशाळगडाने बोलावलं तेव्हा मात्र सह्याद्रीचे दुर्गसेवक झटताना दिसले. किल्ल्यावर घाण पाहवत नाही जिथे तिथे पडलेली हि कोंबडीची पिसं, बोकडांचा वास, सर्वत्र पसरलेला दुर्गंध सहन होत नाही म्हणून आम्ही किल्ल्यावर जात नाही असे म्हणणारे हि काही आहेत त्यांना एकच सांगावंसं वाटतं ' घाण साफ करायची असेल तर त्यात उतरावं लागतं ,किती पसरलीय त्याचा अंदाज घ्यावा लागतो. स्वतःचा श्वास कोंडून त्यात उतरलात तर आणि तरच किल्ला मोकळा श्वास घेऊ शकेल. जर आपण गेलो नाही तर किल्ल्यावर जागा विकणे आहे हे फलक बघून जे जातील ते एक एक तुकडा तुकडा करून किल्ला कधी विकत घेतील समजणार नाही. आणि विशाळगड विशाळगाव झाला म्हणून सर्व पुन्हा एकदा सोशल मीडियावर आक्रोश करत बसू आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल..
लोखंडी शिडी चढून रणमंडळ टेकडी वरून थोडं वर गेल्यानंतर समोरच एक दिशादर्शक फलक आहे ज्यात किल्ल्यावरील महत्त्वाच्या ठिकाणांचा नकाशा आणि नावं लिहलेली आहेत फलकाच्या बाजूलाच एक पायरीमार्ग आहे जो किल्ल्यावर जातो. अतिक्रमणामुळे किल्ल्यावर पुरातन वास्तूपेक्षा गावकऱ्यांची राहती घरं जास्त दिसतात बहुतेक घरांमध्ये खाणावळीची आणि राहण्याची सोय आहे गडावर काही दुकानं आहेत. पायरी मार्गावरून पुढे गेल्यावर डावीकडे एक पायवाट वीर बाजीप्रभू आणि वीर फुलाजीप्रभू यांच्या समाधी कडे जाते. वाट लहान आणि निसरडी आहे कदाचित कुणी जात नसावं जास्त म्हणून डागडुजी झालेली नसावी.पावसाचे पाणी वाहत होतं आणि वाटेवरच्या दगडावर शेवाळ जमा झाली होती, आम्ही सावधतेने इथून पुढे जात होतो इथून डावीकडे एक पायवाट जाते थोडं पुढे चालत गेलं कि समाधीचं दुरून दर्शन होतं .समाधीकडे जाण्याआधी आम्ही अमृतेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो मंदिराकडे पाहून तिथे कुणी येत जात असावं वाटत नाही मंदिराच्या परिसरात प्लास्टिकच्या,काचेच्या बाटल्या आणि बराचसा कचरा साचलेला दिसतो. मंदिराच्या चारही बाजूनी चिखल जमा झालेला होता मंदिरासमोरच बाहेर बिल्व पत्राच्या झाडाखाली एक अर्धवट तोफ दिसते तोफेचा घेर पाहून ७-८ फूट पेक्षा मोठी असावी असा माझा अंदाज आहे. हि तोफ काही वर्षा पूर्वी मंदिराच्या डाव्याबाजूस जमिनीमध्ये अर्धवट रुतलेली होती. मंदिरासमोर एक छोटासा धबधबा खाली असलेल्या एका कुंडामध्ये कोसळत होता नयनरम्य दृश्य होतं. मंदिराच्या मागच्या बाजूने खाली एक पायवाट पाताळदरी कडे जाते एक लहानसा ओढा पार केला कि समोर वीर बाजूप्रभू देशपांडे आणि वीर फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीचं दर्शन होतं या समाधीवर सह्याद्री प्रतिष्ठान कडून छत बसवण्यात आलेले आहे. ह्या वीरांच्या समाधी समोर नतमस्तक होऊन आम्ही पुढे निघालो. समाधीच्या अगदी समोर एक शिवकालीन प्राचीन विहीर दिसते हि विहीर बुजून गेली होती . सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी ती साफ करून उपसून तिला नवसंजीवनी दिली आता ह्या विहिरीतील पाणी काचेसारखं स्वछ दिसत होतं, ह्या विहिरीत पाण्याचे जिवंत झरे आहेत ह्या विहिरीतील ज्यादा पाणी वाहून जाण्यासाठी एक खिडकी आहे हे ज्यादा पाणी त्याच्या पुढच्या एका विहिरी मध्ये जमा झालेलं दिसते.
इथून थोडं पुढे गेलं कि एक ओढा लागतो तो पार करून एक चढ चढून गेलं कि एक खोल दरी दिसते, उजवीकडे शिवकालीन पूल इतिहासाची साक्ष देत आजही उभा आहे. दरीत डोकावून पाहिलं तर इथेही कचऱ्याचा ढीग दृष्टीस येतोच .
आम्ही आलो त्या वाटेने न जाता दुसऱ्या एका पायवाटेने पुन्हा वरती गेलो जिथे डावीकडे वळण घेतलं तिथे आलो. हा मुख्य रास्ता इथून समोर मशिदी दिसतात असं पाहायला गेलं तर ह्या मशिदी कुठूनही नजरेस येतात पण येतानाच ठरवलेलं सर्व दुर्लक्ष करून एकदा किल्ला पाहायचा. मशिदीच्या दारातच एक ध्वज स्तंभावर जीर्ण झालेला भगवा दिसला आणि जणू तो आपल्याच प्रतिक्षेत तिथे ताटकळत उभा आहे असा भास झाला, पण ठरल्या प्रमाणे सर्व दुर्लक्ष करून पुढे गेले इथून पुढे नरसिंह मंदिर आहे इथे जाणारी वाट चिखलाने आणि कचऱ्याने भरलेली होती. किती दुर्लक्ष करा पण हे प्लास्टिक आणि काचेचे रंगीबेरंगी तुकडे लक्ष वेधून घेत होते. किल्ल्याची दुरावस्था बघून जीव तुटत होता. ज्या कोनाड्यात पूर्वी दिवे लावले जात असतील तिथे आज बाटल्यांचा खच जमा झालेला दिसत होता. पुढे फक्त दर्गा दिसतो म्हणून आम्ही माघारी आलो तिथून पुन्हा दर्ग्या जवळ आलो तिथून उजव्या बाजूला एक रास्ता भोसले वाडी कडे जातो आम्ही त्या वाटेने निघालो इथे भगवंतेश्वराच्या मंदिराला लागूनच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि मागच्या बाजूला गणपती मंदिर आहे.
भगवंतेश्वराच्या मंदिरा मध्ये डाव्याबाजूला समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे उजव्या बाजुला ब्रह्मदेवाची मूर्ती दिसते. गाभाऱ्यासमोरच नंदी महाराज महादेवाच्या प्रतिक्षेत बसलेले आहेत. गाभार्याच्या एका बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर उजव्याबाजूला एक गोमुख दिसत शंभू महादेवाच्या पिंडीवरून जाणार पाणी इथून बाहेर येतं. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी आणि गणपतीची दगडी मूर्ती आहे.
मंदिराच्या अंगणात ध्वज स्तंभ आहे ह्याच्या बाजूने एक वाट जाते तिथे एक अदृश्य पिंड आहे. 'चपला काढा आणि पुढे जा.' असं मंदिराची देखभाल करणाऱ्या काकांनी सांगितलं. आम्ही त्यांच्या सूचनेचं पालन करत चपला काढून पुढे गेलो उजव्याबाजूला झाडझुडपांमध्ये लपलेली एक विहीर आहे जवळ जाऊन कट्ट्यावर उभे राहिले आणि खाली पहिले तर ह्या विहिरीचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे हे कळलं. अदृश्य पिंडीचं कोडं उलगडलं, नकळत हाताच्या तर्जनीचा कपाळापासून ते ह्रिदयापर्येंत प्रवास झाला आणि मनोमन महादेवाच्या पाय पडले.
विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक गणपती मंदिर आहे मंदिरा बाहेर एक वीरगळी आणि मंदिराच्या बाहेर डावी कडे एक तोफ ठेवलेली आहे. इथून पुन्हा मागे आलो कि एक वाट पंतप्रतिनिधींच्या राजवाड्याकडे जाते. वाड्याबाहेर चोकोनी तलाव दिशादर्शक फलक आहे इथून डोकावण्याचा मोह आवरून राजवाड्यात प्रवेश केला तर डाव्याबाजूला एक भुयारी मार्ग आहे. पायऱ्या उतरून गेल्यावर सुंदर चोकोनी विहीर दिसते आरश्यासारखं पारदर्शी निळे शार पाणी आजूबाजूला पावसामुळे वाढलेली हिरवळ त्याचं विहिरीतील प्रतिबिंब मनमोहक दृश्य ते हे!! एखाद्या चांदण्या रात्री इथे येऊन पाहिलं तर अवघे आकाश धरतीवर उतरलंय असच वाटेल !!! अशी कल्पना चित्र रंगवून तिथून मी बाहेर आले. राजवाड्याचे काही अवशेष इथे दिसतात. इथून आलेल्या वाटेने माघारी गेलो ते मुंढा दरवाज्यापाशी दरवाज्याची एक कमान सोडली तर बाकी बांधकाम नवीन आहे हे स्पष्ट दिसून येत. दरवाज्यावर सुंदर नक्षी कोरलेली आहे. दरवाज्याला वरच्या बाजूला दोन दगडी पोकळ गोल दिसतात हयाचा वापर कडी /आडा लावण्यासाठी केला जायचा. दरवाज्यातून पुढे तटबंदीवर जाऊन पाहिलं तर काही दुर्गसेवक तिथला कचरा साफ करताना दिसले. इथून आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसत होता पण वेळे अभावी पटापट इथून पुढे उजवीकडे असलेल्या तोफेकडे वळलो तोफ साधारण ७ फूट पेक्षा मोठी असावी स्वराज्याची सेवा करून जणूकाही त्या दगडी चाहुतऱ्यावर भूतकाळातल्या आठवणी आठवून आता विश्राम करत असावी अशीच भासते.
मुंढा दरवाज्यापासून सरळ चालत गेले कि उजवी कडे थोडी दूर एक वास्तू नजरेस पडते ती पहिले श्री. राजाराम महाराजांचा सिंहगडी काळ झाल्यांनतर त्यांच्या पगडी समवेत सती गेलेल्या महासाध्वी पत्नी श्री अहिल्याबाई राणी साहेब यांची समाधी. समाधीच्या दगडावर पावसामुळे बरीचशी लहानलहान रोप उगवलेली होती दगडावर शेवाळ जमा झाली होती समाधी पर्येंत जायला साधी पायवाट नव्हती हि सल मनाला लागून राहिलीय.
पुन्हा मुंढा दरवाज्याकडून गड उतरायला सुरवात केली येताना दगडी पायरी मार्गाने उतरलो समोर विशाळगडाची भव्य तटबंदी दिसते पाण्याचा निचरा होण्यासाठी तटबंदीमधे त्रिकोणाकृती पोकळी आहे. खाली काही पायऱ्या उतरल्यानंतर दोन्ही बाजूला बसण्यासाठीचे कट्टे दिसतात काही लोक म्हणतात, इथे शिपाई बसत असत पण कुठे दिवे ठेवण्यासाठी कोनाडे दिसत नाही किंवा कोणत्या खोल्या पूर्वी असाव्यात असं दिसून आलं नाही. खाली उतरत असताना लक्ष वेधून घेतलं ते डाव्याबाजूला असणाऱ्या दोन लाल चौकटींनी थोडं जवळ जाऊन निरखून पाहिलं असता त्या वीरगळी आहेत हे लक्षात आलं. आम्ही गड उतार झालो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. विशाळगड पन्हाळ गड पाहायला जावा आणि बांदल आणि बाजींच्या रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीचे दर्शन न घेता माघारी जाणं म्हणजे वारीला जाऊन विठूमाऊलीच दर्शन न घेण्यासारखाच आहे. आम्ही परतीच्या वाटेवर या वीरांच्या पराक्रमापुढे नतमस्तक झालो पावनखिंडीत उभं राहून त्या काळी झालेल्या रणसंग्रामाचा विचार केला तर अंग शहारून आलं होत. शनिवारी १६ जुलै २०२२ सायंकाळी ७ वाजता ठाणे वरून सुरु झालेला हा प्रवास १८ जुलै २०२२ पहाटे ४ वाजता ठाणे मध्ये संपला. ह्या प्रवासात खूप सारे क्षण कॅमेरामध्ये कैद केले.नवीन ओळखी झाल्या काही गोष्टी नव्याने माहित झाल्या आणि इतिहासाबद्दल किल्ल्याबद्दलच कुतुहूल अजून वाढत गेलं.
नावाप्रमाणे विशाल असलेला विशाळगड एका दिवसात पाहता आला नाही कोणताही किल्ला एका दिवसात पाहून होत नसतो आणि जितक्या वेळा या वास्तुंना भेट द्यावी त्या त्या वेळी हि नवीन इतिहासाची पानं उलगडत जातात.
"किल्ला नुसता पाहायचा नसतो तो अनुभवायचा असतो इथला एक एक दगड इतिहास सांगत असतो फक्त तो ऐकून समजून घेता आला पाहिजे." असं माझं वयक्तिक मत आहे.
ज्या ज्या दुर्गसेवकांनी ह्या मोहिमेमध्ये सहभाग घेतला त्यांचे मनापासून आभार !!!


